Blogs:तिरळेपणा समस्या - वैयक्तिक तरीही सामाजिक.

19-Jan-2018 11:55 PM


       चेहऱ्याच्या सौंदर्यात डोळ्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. कोणाकडे पाहताना व संभाषण करताना आपण समोरच्या डोळ्याकडेच पाहतो किंबहुना डोळ्याची भाषा एकमेकांना लवकर समजते, परमेश्वराने प्रत्येकाला २ डोळे दिले आहे. त्याची हालचाल एकाच वेळी एकाच दिशेने एकमेकांना समांतर असते त्यांच्या हालचालीत ताळमेळ असतो. जरी दोन्ही डोळ्यातील प्रतिमेत थोडासा फरक असला तरी दोघे एकत्रित काम करतात.त्यामुळे आपली दृष्टी अधिक चांगली होते व आपल्याला 3D  नजर मिळते. दोन्ही डोळ्यांची हालचाल एकमेकांना पूरक व्हावी.यासाठी डोळ्याच्या भोवती सहा वेगवेगळे स्नायू आहेत. या स्नायूचे नियंत्रण मेंदूच्या फ्रांन्टल कॉर्टेक्सकडुन वेगवेगळ्या नर्व्हज मार्फत केले जाते.

     ज्यावेळी दोन्ही डोळ्यांची एकत्रितपणे काम करण्याची क्षमता कमी होते किंवा संपते व त्यामुळे बुबुळं समांतर दिसत नाहीत, त्याला तिरळेपणा असं म्हणतात. अशावेळी एक डोळा आत, बाहेर, वर किंवा खाली वळलेला दिसू शकतो. भारतामध्ये तिरळेपणाचं प्रमाण तीन ते पाच टक्के आहे.
        तिरळेपणा बद्दल कमी माहिती असल्याने व अंधविश्वासामुळे तिरळेपणा तसा डोळ्याचा दुर्लक्षित आजार आहे तिरळेपणा मागे दृष्टीदोष असतो हे फार कमी लोकांना माहित आहे. सुदैवाने बहुतेक वेळा दुसरा डोळा चांगला असल्याने तिरळ्या डोळ्याकडे पेशंट व पालकही दुर्लक्ष करतात. केवळ वैद्यकीय अपात्रता, ड्रायव्हिंग लायसेन्स, लग्न ठरविताना आलेल्या बाधा किंवा नोकरी साठी अडचण यावेळीच त्याच्यावर उपचाराचा विचार केला जातो.

     बहुतेक प्राण्यांना जरी दोन डोळे असले तरी तिरळेपणा हा आजार इतर प्राण्यात दिसत नाही. जवळचे जास्त पाहणे, चष्मा, तिरळेपणा व डोळ्याचे डॉक्टर हा प्रकार मनुष्य प्राण्यातच जास्त आढळतो. मुख्यत्वे करून लहान मुलांमध्ये तिरळेपणा जास्त दिसतो. १.५ ते  ४ वर्षे मध्ये तिरळेपणा ची सुरुवात होते. काहीवेळा वयाच्या ६ महिन्यापासून तर काहीवेळा तरुण किंवा प्रौढ वयातही तिरळेपणा होवू शकतो. लहान मुलांमध्ये दोन्ही डोळे ३ ते ६ महिने या वयामध्ये एकत्र काम करायला सुरुवात करतात, ६ ते ७ वर्षापर्यंत हि प्रक्रिया पूर्ण होते, या प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास तिरळेपणा येवू शकतो.

     पूर्वीपेक्षा तिरळेपणाचे  प्रमाण आता वाढत आहे. याचे कारण जवळ चे पाहण्यासाठी डोळ्याचा अतिवापर ,व्हिडीओ गेम, अभ्यास, कॉम्पुटर, मोबाईल , (अतिप्रगतीचा दुष्परिणाम). आपले पूर्वज दुरचच जास्त पाहत. आजही दूर चांदण्याकडे पहिल्याने डोळ्यांना आराम मिळतो. औषधे, केमिकल्स व आहाराचाही परिणाम आहेच काही कुटुंबामध्ये तिरळेपणा हा अनुवांशिक आहे.दृष्टीदोष व चष्माचा नंबर ही महत्वाची कारण आहे बहुतेक वेळा मायनस नंबर असल्यास  डोळा बाहेर वळतो व प्लस नंबर आल्यास डोळा आत वळतो. दोन्ही डोळ्यांच्या नंबर मध्ये जास्त फरक असल्यास तिरळेपणाचे प्रमाण जास्त असते.डोळ्यातील एखाद्या भागात दोष असल्यास किंवा जन्मजात मोतीबिंदू किंवा डोळ्यात फूल पडले किंवा रेटीना वर डाग रेटीनोल्बास्टोमा हा डोळ्यातील कॅन्सर असल्यास तिरळेपणा येवू शकतो. डोळ्याच्या स्नायू मध्ये जन्मजात दोष असल्यास,मार लागल्यामुळे किंवा मधुमेहासारख्या इतर आजाराने स्नायूची पॅरालिसीस झाली असल्यास तिरळेपणा येवू शकतो दोन्ही डोळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याची मेंदूची क्षमता कमी झाल्यासही तिरळेपणा होवू शकतो.

     तिरळेपणाबद्दल लोकांच्या मनात खूप चुकीच्या समजुती आहेत. बऱ्याचदा असं सांगितलं जातं, की मूल जसं मोठं होईल, तसा तिरळेपणा आपोआप कमी होईल. देवाचा कोप,केसाची बट,पाळण्याच्या एका कोपऱ्यात रंगीत खेळण, तिरळ्या मुलाची नक्कल केल्यामुळे व डोळ्यावर टोपडे झाकले गेले त्यामुळे तिरळेपणा येतो असे बहुतेकांना वाटते. काही पालक तिरळेपणावर इलाजच नाही किंवा ऑपरेशन करावं लागेल या भीतीपोटी मुलांना डॉक्टरांकडे नेणं टाळतात. तसं केल्यास मुलांच्या नजरेवर कायमचा परिणाम होऊ शकतो. ३० ते ४० टक्के मुलांमध्ये तिरळेपणाचा प्रश्न योग्य चष्मा वापरल्यानं किंवा इतर उपचारांनी सोडवता येऊ शकतो.
तिरळेपणा चे वेगवेगळे प्रकार आहेत व त्याची कारणेही भिन्न आहेत. काही मध्ये तिरळेपणा कमजोरी जास्त आल्यावर जाणवतो. एक विशिष्ट दिशेला पाहिल्यावरच दिसतो किंवा काही मध्ये नेहमीच दिसतो. तिरळेपणाचे स्थूल मानाने दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे पॅरालिटीक ज्या मध्ये डोळ्याच्या एखाद्या स्नायू ला पॅरालिसीस होते त्यात रक्तदाब , मधुमेह , अपघात मेंदूमधील विकार व ताप इत्यादी गोष्टी कारणीभूत असतात. हा प्रकार शक्यतो मोठ्या माणसाना होतो. डबल दिसू नये म्हणून यासाठी रुग्ण मान तिरकी किंवा एका बाजूला मान वळवून बघण्याचा प्रयत्न करतात. समोरील वस्तू नीट दिसत नसल्यामुळे चक्कर आल्यासारखी होते व मळमळू लागते. दुसरा प्रकार कनकमिटंट तिरळेपणा असे म्हणतात. तो नेहमी लहान मुलांमध्येच आढळतो. यामध्ये डोळ्याच्या हालचाली सर्व बाजूला व्यवस्थितपणे होतात. हा तिरळेपणा मान तिरपी करून कमी होत नाही.

तिरळेपणा चे दुष्परिणाम-

     तिरळे असणाऱ्या डोळ्याची नजर कमी होत जाते त्यामुळे एक डोळा आळशी बनतो. साधारणतः ५० टक्के मुलांमध्ये ही समस्या आढळते. लहान वयात उपचार केल्यास, चांगला डोळा बंद करून तिरळ्या डोळ्यास बघण्याची सवय लावल्यास नजर सुधारु शकते. तसे न केल्यास कायमस्वरूपी कमजोर राहतो. दोन्ही डोळ्यांची एकत्र काम करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे थ्रीडी व्हिजन निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रामध्ये मुलांना संधी मिळू शकत नाही. वय वर्षं आठनंतर सुरुवात होणाऱ्या तिरळेपणामुळे डबल व्हिजन किंवा दोन दोन दिसणे हा प्रकार अतिशय त्रासदायक ठरतो. कुठेही वावरणे चालणे, पायरी उतरणे, अशक्य होवून बसते. मुल मान तिरपी करून बघतात व तशी सवयच लागते. ' तिरछी नजर है, पटली कमर है ' अस वर्णन एखाद्या सुंदर स्त्रीच करतात. त्यावेळी तिरपा नेत्रकटाक्ष कवीला अपेक्षित असतो. पण एखादा माणूस नेहमी तिरळा बघू लागला कि चकण्या कान्या म्हणून त्याची हेटाळणी केली जाते. त्यामुळे त्या मुलावर मानसिक परिणाम होवू शकतो. त्याचा आत्मविश्वास कमी होवू शकतो.  व सामाजिक न्युनगंड पालकामध्ये व मुलांमध्ये निर्माण होतो.डोळ्यातील व्यंगामुळे लग्न ठरविताना , सर्व्हिस मध्ये अडचणी येवू शकतात.

तिरळेपणा चे उपचार-

     तिरळेपणा असणाऱ्या रुग्णाची नेत्रतज्ञाकडून सखोल तपासणी केल्यानंतर तिरळेपणा किती डिग्री आहे व त्याचे कारण व प्रकार कोणता आहे व त्यासाठी कोणती उपाययोजना आहे हे डॉक्टर ठरवितात. सर्वसाधारणत: १/३ रुग्णावर विनाशस्त्रक्रिया उपचार करता येते. १/३ न शस्त्रक्रिये ची जरुरी पडते.काही रुग्णाचे निरीक्षण केले जाते तर काहीना संपूर्ण उपचार नसतात.

     बहुतेक वेळा चष्मा नंबर देवून जरूर भासल्यास प्रिझमचा चषम्यात वापर करून तिरळेपणा कमी होवू शकतो. कमजोरीमुळे आलेला तिरळेपणा शक्तिवर्धक औषधे आहार बदल व डोळ्याच्या व्यायामाने कमी होवू शकतो.

     तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेने तिरळे डोळे सरळ होतात हि संपूर्णपणे सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. बऱ्याच वेळा दोन्ही डोळ्याची तर काही वेळ एका डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागते तिरळेपणा ची शस्त्रक्रिया सर्व वयोगटात योग्य त्या भूल खाली केली जाते.शस्त्रक्रिये नंतर एक दिवस डोळ्याला पट्टी असते. १५ दिवस डोळे लालसर असू शकतात व औषधोपचार एक महिना करावा लागतो. काही वेळा शस्त्रक्रिया नंतर काही दिवस डबल दिसते. जे कि हळू हळू कमी होते काही वेळा २ सिटींग मध्ये तिरळेपणा ची शस्त्रक्रिया करावी लागते.

     आजकाल तिरळेपणा शस्त्रक्रियासाठी समाजात जागरूकता दिसून येत आहे. तिरळेपणाचे रुग्ण स्वतः हून शस्त्रक्रियेसाठी पुढे येत आहेत. व शासनाने सुद्धा तिरळेपणा निर्मुलन मोहीम हाती घेतली असून राजीव गांधी जीवनदायी अंतर्गत तिरळेपणा व तिरळेपणाला कारणीभूत असणाऱ्या बालवयातील मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया पूर्णत: मोफत केल्या जातात. त्या अंतर्गत खाजगी रुग्णालय व वेगवेगळ्या सामाजिक संस्थाद्वारे ठिकठिकाणी तिरळेपणाची शिबीर घेतले जातात.


डोळा रचना व कार्य

19-Jan-2018 11:48 PM


     डोळा हे पंचेंद्रियापैकी एक महत्वाचे इंद्रिय आहे. पाहणे व त्यायोग्य माहिती मिळवणे हे डोळ्याचे मुख्य कार्य आहे. डोल्यामुलेच हा सुंदर सृष्टीचा आपण उपभोग घेवू शकतो.माणसाने आपल्या मेंदूद्वारे ज्ञान ग्रहण करून आज जी प्रगती केली आहे त्या ज्ञानापैकी ८०% ज्ञान डोळ्यामुळे होते. डोळे हे निसर्गाने प्राणिमात्राला दिलेली अनमोल देणगीच आहे. प्राणीमात्रांमध्ये दोन डोळे असतात. प्रत्येक डोळा जरी स्वतंत्रपणे काम करत असला तरी दोन्ही डोळ्याची नजर मेंदू एकत्र करतो त्यामुळे आपल्याला बायनौक्सुलट व्हिजन मिळते. दोन्ही डोळे एकत्रित पणे काम करतात. एकाच वेळी हलतात व एकाच वेळी विश्रांती घेतात.

     आपला डोळा हा गोलाकार असून त्याचा व्यास साधारपणे २.५  सेमी. म्हणजेच टेबल टेनिस च्या बॉल एवढा असतो. आकाराच्या मानाने डोळ्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे असते डोळ्यातील पेशीमध्ये कोट्यावधी कनेक्शन असतात व जागी पाणी कोणत्या हि क्षणी किमान १५ लाख निरोप हाताळले जात असतात. डोळा हा मेंदूचाच पुढे आलेला भाग आहे असे हि म्हणता येईल.

     डोळा हा नाजूक अवयव असल्यामुळे कवटीच्या कठीण हाडाचे नैसर्गिक सौरक्षण त्याला लाभलेले आहे . त्यामुळे एखाद्या कठीण वस्तूचा आघात डोळ्याच्या आजूबाजूला झाला तरीही डोळ्याला विशेष इजा न होता बरीच शी इजा या हाडांवर झेलली जाते. डोळ्याच्या कवटीतील खाचे डोळा ७ हाडांनी वेढलेला आहे. या खाचेचा बाह्य भाग रुंद व काहीसा चौकोनी असून आतील भाग निमुळता शंकू सारखा आहे. डोळ्याच्या या खाचेत डोळा, डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या डोळ्याची हालचाल करणारे ६ स्नायू दृष्टीचेतातंतू म्हणजेच (optic nerve) व इतर कनेक्टीव्ह पेशी असतात. त्यात असणाऱ्या मदामुळे (Orbital fat ) डोळा स्थिर राहतो. डोळ्याच्या पुढील भागात अश्रुग्रंथी(Lacrimal gland), अश्रुपिंड (Lacrimal sac ) व पापणी असते. जागे असताना दर मिनिटास ८-१० वेळा पापण्यांची उघडझाप होते. डोळा तीन थरांनी बनलेला असतो. या थरांना बाहेरून आत अनुक्रमे श्वेतपटल(Sclera), रंजितपटल(Uveal tissue) आणि दृष्टिपटल(Retina) अशी नावे आहेत.

श्वेतपटल (Sclera): हे डोळ्याचे सर्वांत बाहेरील पटल असून ते सुदृढ आणि पांढऱ्या तंतूंनी बनलेले असते. श्वेतपटल पांढऱ्या रंगाचे असून त्याचा बाहेरून दिसणार भाग पारदर्शक, तर मागचा न दिसणारा भाग अपारदर्शक असतो. श्वेतपटलाच्या पारदर्शक भागाला पारपटल (Cornea) म्हणतात. पारपटलाच्या पुढच्या भागावरील आवरणाला नेत्रावरण (Conjunctiva) म्हणतात. हे अत्यंत संवेदनशील पारदर्शक आवरण असते. आतील सूक्ष्म अवयावांचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य काम असते.

रंजितपटल (Uveal tissue): हा डोळ्याचा मधला थर आहे. या थरात पुष्कळ रक्तवाहिन्या असून तो श्वेतपटलाला चिकटलेला असतो. या थरामध्ये रंगीत संयोजी ऊती(Connective tissue) असतात. रंजितपटलाच्या मागील बाजूने नेत्रगोलामध्ये दृष्टिचेतातंतू(Optic nurve) प्रवेश करते. रंजितपटलाच्या मोकळ्या भागातून दिसणाऱ्या चकतीच्या आकारास बुबूळ (परितारिका) म्हणतात. बुबळाच्या मध्यभागी लहान-मोठ्या होणाऱ्या काळ्या बिंदूला बाहुली म्हणतात. बुबळात असलेल्या दोन प्रकारच्या स्नायूंमुळे प्रकाशाच्या तीव्रतेनुसार बाहुलीचा आकार लहान-मोठा होतो.

     बुबळाच्या आतील बाजूस नेत्रभिंग (Lens) असून ते पेशींनी बनलेले असते. नेत्रभिंग बहिर्गोल असून ते नेत्रभिंगकोश या पातळ व पारदर्शक पिशवीत असते. नेत्रभिंगकोशाभोवती असलेले रोमक स्नायू (Ciliary muscle) आणि रोमक प्रवर्ध (Suspensary Ligament) यांमुळे नेत्रभिगांची जाडी कमी-अधिक होते. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे नेत्रभिंगाचे नाभीय अंतर बदलते आणि प्रतिमा दृष्टिपटलावर स्पष्ट पडते. श्वेतपटल आणि बुबूळ यांमधील लहान कक्षाला अग्रकक्ष(Anterier segment), तर बुबळाच्या मागच्या बाजूस असलेल्या मोठ्या कक्षाला पश्चकक्ष (posterior segment)म्हणतात. अग्रकक्षामध्ये पाण्यासारखा द्रव असतो. त्याला अ‍क्विअस ह्युमर(Aqueous humour) म्हणतात. . पश्चकक्षामध्ये जेलीसारखा द्रव म्हणजेच व्हिट्रिअस ह्युमर(Vitreous humour) असतो.

दृष्टिपटल(Retina) : हा डोळ्याचा सर्वांत आतील थर असून तो प्रकाशसंवेदी (Photo Sensitive) पेशींच्या थरांनी बनलेला असतो. दृष्टिपटलाचा बाह्यस्तर मेलॅनीन या रंगद्रव्याने बनलेल्या पेशींचा असतो. प्रकाशसंवेदी पेशी दोन प्रकारच्या असतात; दंडपेशी (Rods) आणि शंकुपेशी(Cones). ही नावे त्यांना आकारानुसार पडली आहेत. मानवी दृष्टिपटलात सु. १२ कोटी दंडपेशी आणि सु. ६० लाख शंकुपेशी असतात. दंडपेशी आणि शंकुपेशींवर प्रकाश पडल्यास त्या उत्तेजित होतात. उत्तेजित झाल्यामुळे त्या Electronic impulse निर्माण करतात. दृष्टिपटलाच्या ज्या भागातून दृष्टिचेता (Optic nurve) डोळ्यांमध्ये प्रवेश करते तेथे दंडपेशी व शंकुपेशी नसतात. या भागास अंधबिंदू (Blind Spot) म्हणतात. दृष्टिपटलाच्या मध्यभागात एक वर्तुळाकार पिवळसर भाग दिसतो. त्यास पीतबिंदू(Yellow Spot) म्हणतात. या भागात शंकुपेशींची संख्या सर्वांत जास्त असल्यामुळे या भागात दृष्टिसंवेदना उच्च असते. नेत्रगोलाबाहेर सहा स्नायूंमुळे नेत्रगोलाची हालचाल होते.

डोळ्यांचे कार्य कसे चालते :

     डोळ्यांची रचना एखाद्या कॅमेऱ्यासारखी असते. परंतु डोळ्यांचे कार्य कॅमेऱ्याहून अधिक संवेदनशील असते. दृष्टिपटलावर प्रतिमा पडली की दंडपेशी आणि शंकुपेशी यामध्ये रासायनिक क्रियांमुळे एखादा Electronic impulse निर्माण झाला की या पेशींना जोडून असलेल्या चेतापेशींद्वारे दृष्टिकेंद्राकडे वाहून नेला जातो आणि तेथे प्रतिमेचे संवेदन (परसेप्शन) घडते.

     दंडपेशीत ऱ्होडॉप्सीन हे रंगद्रव्य असते. त्यामुळे राखाडी रंगाच्या छटा ओळखता येतात. शंकुपेशीत तीन रंगद्रव्ये असतात. त्यामुळे रंगांचे ज्ञान होते आणि उजेडात प्रतिमा स्पष्ट दिसतात. शंकुपेशीतील सायनोलेब, क्लोरोलेब आणि एरिथ्रोलेब या रंगद्रव्यांद्वारे अनुक्रमे निळा, हिरवा आणि लाल रंग शोषले जातात. त्यामुळे आपले डोळे २०० पेक्षा अधिक रंगछटांतील फरक ओळखू शकतात. पीतबिंदूमध्ये प्रामुख्याने शंकुपेशी असतात. आपण जे पाहतो, त्याची स्पष्ट प्रतिमा या भागाद्वारे निर्माण होते. दृष्टिपटलाच्या उर्वरित भागात दंडपेशी मोठ्या संख्येने असतात आणि या भागाद्वारे परिघीय प्रतिमा निर्माण होतात. याचा अर्थ, आपली नजर सरळ दिशेत असताना आपल्याला आजूबाजूचे चित्र या भागामुळे दिसते. दंडपेशी काळोखाला अधिक संवेदी असतात. त्यामुळे आपली नजर ज्या वस्तूंवर रोखलेली नसते त्या वस्तूही आपल्याला दिसतात.

     अशी ही डोळ्यांची रचना कार्य एखाद्या सुपर कॉम्पुटरला लाजवेल इतकी गुंतागुंतीची आहे. सुपर कॉम्पुटरपेक्षाही जलद वेगाने आपल्याला दृष्टीज्ञान करून देणाऱ्या निसर्गाची ही एक किमयाच म्हणायला पाहिजे.

     डोळ्याचा पुढचा भाग एखाद्या घड्याळाच्या काचेसारखा स्पटिकाइतका पारदर्शक पडद्याचा बनलेला आहे. त्याला बाह्यपटलामध्ये बारीक मज्जातंतूचे जाळे असल्यामुळे हा भाग अतिशय संवेदनशील आहे. जरी एखादा बारीकसा धुळीचा कण डोळ्याच्या बाह्यपटलाला लागला तरी आपल्या पापण्या ताबडतोप प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे मिटतात व डोळ्यांचे संरक्षण होते.

     डोळ्याच्या पापण्या या डोळ्याचे बाह्यसंरक्षण कवचच म्हणा ना ! त्याच्या टोकाशी असलेल्या केसांमुळे डोळ्यामध्ये धुळीचे कण अथवा इतर घन सहजासहजी जाऊ शकत नाही. हे केस एक प्रकारे संरक्षण जाळीचे किंवा फिल्टरचे काम करतात.

     रंगपटलाच्या मागे स्पटिकासारखे पारदर्शक बहिर्गोल भिंग असते. त्याद्वारे डोळ्यामध्ये पडणाऱ्या प्रकाशाचे वक्रीभवन व प्रकाश अंत:पटलवर पडण्यास मदत होते. या भिंगाची तुलना कॅमेऱ्याच्या भिंगाशी करता येईल आपले भिंग सुर्यकिरणांमध्ये असणारे अपायकारक असे इन्फ्रारेड किरण व अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेते व त्यापासून आपल्या अंतपटलाचे संरक्षण करते.

     डोळ्याच्या आतील पोकळीमध्ये दोन प्रकारचे द्रव असतात. डोळ्याच्या बाह्यपटल व रंग पटल यांच्यामध्ये असणाऱ्या द्रावला 'र्अॅक्विअस ह्यूमर' असे म्हणतात. त्याच्यामधील पोषक द्रव्यांमुळे डोळ्याच्या बाह्य पटलाचे पोषण होते आणि ते स्पटिकासारखे पारदर्शक राहते या द्रव्याच्या अभिसाराणामध्ये अडथला झाल्यास डोळ्याच्या आतील तान वदतो व काचबिंदू हा रोग होतो. डोळ्यातील आतल्या पोकळीमध्ये 'व्हिट्रियस' नावाचा जेली सारखा बलक असतो, तो पारदर्शक असल्यामुळे प्रकाशकिरण अंतपटलावर काही अडथळा न येता पोहोचू शकतो. व्हिट्रियस व अक्वियस द्रावांचा दाबामुळे डोळा बिलबिलीत न राहता काहीसा टणक राहतो.


काचबिंदू - एक छुपा दृष्टी चोर.

19-Jan-2018 11:39 PM


     पूर्वसूचना न देता चोरपावलाने येऊन संपूर्ण दृष्टी नकळत हिरावून घेणाऱ्या काचबिंदू या आजाराबद्दल आज अनेक गैरसमज आहेत. काचबिंदू म्हणजे काय, हा प्रश्न सर्वसाधारणपणे ८०-९० टक्के लोकांना पडत असावा! यालाकारण म्हणजे सामान्यांमध्ये असणारी काचबिंदूविषयीची अनभिज्ञता.!
भारतात १५ लाख लोक काचबिंदूमुळे अंध व परावलंबी झालेले असून दरवर्षी हा आकडा लाखोंनी वाढत आहे. जागतिक अंधत्व प्रतिबंधक संस्थेच्या अहवालानुसार जगामध्ये एकंदर अंधात्वांच्या २०% अंधत्व काचबिंदूमुळे येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील ३.९% लोकांना काचबिंदू होतो. संपूर्णपणे टाळता येणारे हे अंधत्व केवळ अजाणतेपणामुळे आपल्याला स्वीकारावे लागत आहे

     काचबिंदू म्हणजे डोळ्याची नस किंवा ऑप्टिक नर्व्ह शुष्क होण्याची प्रक्रिया! यामुळे डोळ्यातून मेंदूकडे जाणारे तंतू काम करणे बंद करतात व दृष्टी अधू होत जाते. डोळ्यांमध्ये अक्विय्स ह्युमर नावाचे द्रवपदार्थ असतो. त्याचे डोळ्यांमधील अभिसरण व निचरा नीट न झाल्यास डोळ्यातील दाब वाढतो व ऑप्टिक नर्व्हला कायमस्वरूपी इजा निर्माण होते. त्यामुळे आपल्याला सभोवतालच्या नजरेत म्हणजे पेरिफेरल व्हिजनमध्ये दृष्टिदोष निर्माण होतात व म्हणूनच ते आपल्या लक्षातच येत नाही. त्याचप्रमाणे डोळ्यातील दाब हळूहळू वाढल्यामुळे डोळ्यास त्याची सवय होते व डोळा दुखणे, त्रास होणे, लाल होणे असे काहीही घडत नाही. लक्षात न आल्यास ऑप्टिक नर्व्ह हळूहळू काम करणे बंद करते व पुंगळीतून पाहिल्याप्रमाणे कालांतराने थोडीच नजर शिल्लक राहते. हळूहळू ही नजरदेखील लुप्त होते व उरतो तो डोळ्यांसमोर  संपूर्ण काळोख!
     आपल्याला काचबिंदू झाला आहे हे आपल्या लक्षात येत नाही, हेच या आजाराचे विदारक सत्य आहे. काचबिंदू कुणालाही होऊ शकतो. परंतु काही लोकांना काचबिंदू होण्याची शक्यता फार जास्त असते. आपले वय चाळिशीच्या पुढे असल्यास, डायबेटिस असल्यास, जाड चष्मा असल्यास, दीर्घ काळ दमा, संधिवात यासाठी स्टेरॉइड्स घेतल्यास, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनुवांशिकता असल्यास काचबिंदू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. काचबिंदूचे गांभीर्य लक्षात घेता चाळीशीनंतर प्रत्येकाने नेत्रतज्ज्ञांकडून काचबिंदूसाठी स्पेशल तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

काचबिंदूसाठी विशेष तपासण्यामध्ये
१) डोळ्यांतील दाब - टोनोमेट्री
२) बुबुळांची जाडी - पॅकीमेट्री
३) बाहुली फैलावून ऑप्टिक नर्व्हची तपासणी
४) डोळ्यातील द्रव्याचा निचरा होण्याच्या जागेची तपासणी - स्लीट लॅम्प व गोनिओस्कोपी मशीनद्वारे
५) सभोवतालच्या दृष्टीची तपासणी - फिल्ड टेस्ट किंवा पेरिमेट्री तपासणी
६) OCT मशीनव्दारे ऑप्टिक नर्व्हचा 3d स्कॅन व RNFL तपासणी .
यांचा समावेश आहे.
या सर्व प्रकारच्या तपासण्या करून मगच काचबिंदूचे निदान केले जाते. निदान झाल्यास ड्रॉप्स दिले जातात. नियमित स्वरूपातील ड्रॉप्स व नियमित तपासण्या यांनी काचबिंदू नियंत्रणात ठेवता येतो. ज्या वेळी काचबिंदूचे निदान करण्यात येते त्या वेळी जर काही दृष्टिदोष निर्माण झालेला असेल, तर तो दोष किंवा ती नजर आपल्याला परत मिळविता येत नाही; परंतु पुढील प्रक्रिया पूर्णपणे टाळता येते व जी नजर आहे ती वाचविता येते. ड्रॉप्सनी दाब कमी न झाल्यास लेझर थेरपी  किंवा ऑपरेशनदेखील करता येते.
     काचबिंदू प्रामुख्याने या स्वरूपात आढळत असला तरी काही मुलांना जन्मत: तर काही लोकांना अचानकपणे दाब वाढल्याने अॅटॅक येऊन काचबिंदू होऊ शकतो. प्रकार कुठलाही असला तरीही कायमस्वरूपी अंधत्वाकडेच त्याची वाटचाल असते आणि म्हणूनच काहीही त्रास नसला तरी नेत्रतज्ञकडून काचबिंदूसाठी तपासणी करून घेणे गरजेचेच ठरते.

     काचबिंदू हि जीर्ण व्याधी आहे याचा परिणाम दोन्ही डोळ्यांवर होतो. काही लक्षणे निर्माण होईपर्यंत दृष्टीक्षेत्रावर  याचे गंभीर परिणाम झालेले असतात किंवा दृष्टी गेलेली असते. काचबिंदूचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान होणे आणि त्यावरील उपचारच्या साह्याने या गंभीर आजारामुळे येणारे अंधत्व टाळता येते. रुग्ण नियमितपणे तपासण्या व योग्य चिकित्सा घेत असेल तर रुग्णाचे दीर्घकालीन भवितव्य चांगले आहे. रुग्णाने काचबिंदूचे गांभीर्य लक्षात घेवून नेत्रातज्ञाना  सहकार्य करावे काचबिंदू च्या रुग्णाने लक्षात ठेवावे कि काचबिंदू मुळे येणाऱ्या अंधत्वाविरुध्ह लढणाऱ्या पथकामधील नेत्रतज्ञांबरोबर आपण स्वतःसुद्धा एक घटक आहोत.  
     काचबिंदू का होतो हे सामान्यजनांप्रमाणेच वैद्यकशास्त्रासही न उलगडलेले कोडे आहे. आधुनिक वैद्यकशास्रातही काचबिंदूचे मुळापासून बरा करण्यासाठी उत्तर नाही. त्यासाठी जागतिक पातळीवर विविध संशोधन प्रकल्प सुरू आहेत. त्यातील अनुवांशिकता शोधून 'जीन-थेरपी'चे वरदान आपणास मिळू शकेल का याविषयी बरेच शास्त्रज्ञ कार्यरत आहेत.  डोळा मध्यवर्ती ठेवून अॅलोपॅथी, होमिओप्याथि, आयुर्वेद, नॅचरोपॅथी, व योगशास्र यांनी एकत्र येवून होलिस्टिक दृष्टीकोनातून यावर उपाय शोधण्याची गरज आहे. योगशास्त्र व ध्यानधारणा यांचा काचबिंदू वर काय परिणाम होतो? योगा व प्राणायाम यामुळे काचबिंदू मुळे येणारे अंधत्व टाळता येईल का? काचबिंदू होवू नये म्हणून आपण काय करू शकतो. काचबिंदू झाल्यास योगशास्राद्वारे कोणती आसने करावी? कोणती करू नयेत? या विषयी योग विद्यापीठ नाशिक च्या अहमदनगर शाखेनेही संशोधन हाती घेतले आहे. अहमदनगर येथील सुंदर नेत्रालयामध्ये ३० योगसाधक गेले दीड महिन्यापासून यावर प्रयोग करत आहेत. हि फक्त सुरुवात आहे आपल्याला अजून खूप काही संशोधन करायची गरज आहे. यामुळे आपल्या पुढील पिढीला काचबिंदू होऊ नये म्हणून नवीन थेरपीचा यातून उगम होऊ शकेल का, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळू शकतील. किंबहुना हे अंधत्व टाळता येण्याचा मार्गही सापडू शकेल व याचा संपूर्ण मानवजातीलाच फायदा होऊ शकेल.
आज आपल्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण लोकांमध्ये जागृती झालेली नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. या विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे त्यासाठीच हा एक प्रयत्न.

                                                                                                                                                                    डॉ. सुंदर गोरे.

                                                                                                                                                                    नेत्रतज्ञ.

                                                                                                                                                                    अध्यक्ष

                                                                                                                                                                    अहमदनगर जिल्हा नेत्रसंघटना


शारीरिक आजार व डोळे

19-Jan-2018 11:23 PM


     डोळा हा मानवी शरीराचा आरसा आहे. शरीरातील सर्व चांगल्या वाईट घडामोडींचे प्रतिबिंब डोळ्यात उमटत असते. तजेलदार पाणीदार डोळे हे निरोगी शरीर प्रकृती दर्शवितात तर खोल गेलेले निस्तेज डोळे व त्याच्याभोवातालची काळी वर्तुळे अशक्त व रोगट शरीराचे आपल्याला निदान करून देतात.

     डोळ्यांच्या पापण्यांच्या आतील त्वचेचा रंग बघून आपण आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे का हे बघू शकतो. अॅनिमिया किंवा रक्तक्षय या विकारात डोळे पांढरे फटफटीत दिसतात. डोळ्यांच्या पांढऱ्या बुबुळाचा रंग जर पिवळा होवू लागला तर रक्तात कावीळ झाले आहे हे लक्षात येते.

         कुपोषणामुळे आपले डोळे निस्तेज होतात. त्यातल्या त्यात अ जीवनसत्वाचा अभाव डोळ्यांच्या आरोग्याला अतिशय घातक ठरतो. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे डोळे कोरडे दिसू लागतात व रातआंधळेपणा येतो. काळ्या  बुबुळाच्या बाजूला सुरकुत्या दिसतात व साबणाच्या फेसासारखे काळपट पांढरे टीपके दिसू लागतात त्यांना बिटॉटस् स्पॉटस असे म्हणतात. त्यापुढच्या अवस्थेमध्ये डोळ्याच्या पारपटलाला कोरडेपणा येतो व जखमा होतात व ते हळूहळू विरघळून जाण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे कायमचे अंधत्व येते. रातआंधळेपणात रात्रीचे कमी दिसत असल्यामुळे मुले अंधारात चाचपडत  चालतात व अपघात होण्याचीही भीती असते. अ जीवनसत्वाच्या अभावाची लक्षणे दिसू लागली तर नेत्रतज्ञांचा सल्ला घेवून त्यावर अ जीवनसत्वयुक्त औषधे घेतल्यास डोळे बरे होतात . अ जीवनसत्वाचा अभाव टाळण्यासाठी गाजर, पपई, आंबा, शेवग्याचा शेंगा, कोथिंबीर व इतर हिरव्या पालेभाज्या, दुध, अंडी, मासे व कॉडलिव्हर ऑईल या सारखे पदार्थ आहारामध्ये असले पाहिजेत. 

     ‘ ब ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे व त्यातल्या थायमीन या जीवनसत्वाच्या अभावामुळे ऑप्टिक नर्व्ह चा दाह होवून नजर कमी होते. असा अभाव दारू पिणाऱ्याच्या डोळ्यांवर प्रकर्षाने होतो. गावटी दारूत ‘मेथील अल्कोहोलची भेसळ’ केल्यामुळे ती पिल्यास अचानक अंधत्व येवू शकते.

     डोळ्याच्या पापण्याचे केस गळणे व पापण्यांच्या केसाच्या मुळाशी खवले खवले येवून जखमा होणे हा प्रकार केसांच्या कोंड्यामुळे होतो. त्या वेळी डोळ्यांच्या उपचाराबरोबरच डोक्याच्या केसातील कोंड्याचा उपचार करणे जरुरीचे आहे. डोळ्याच्या भोवतालच्या त्वचेला सूज येवून डोळे फिकट पडणे हि किडनीच्या विकारामधील लक्षणे असू शकतात.तर भुवयाचे व पापणीचे केस कमी होणे हि कुष्टरोगाचे  लक्षण असल्यामुळे त्या दृष्टीने त्याची  इतरत्र लक्षणे पाहणे गरजेचे आहे.

     मधुमेह , रक्तदाब आणि थायरॉईड ग्रंथीच्या विकारांमुळे देखील डोळ्यावर परिणाम होतो. मधुमेहामुळे मोतीबिंदूची लवकर वाढ होते. मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असेल तर त्या प्रमाणे डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर देखील कमी जास्त होतो व तो लवकर लवकर बदलतो. वारंवार रांजणवाडी येते व त्यामुळे पापणीला येणारी सूजही जास्त असते. डोळ्याला जर जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही. काचबिंदूचे प्रमाणही मधुमेही रुग्णांमध्ये जास्त असते. मधुमेहामुळे डोळ्याच्या रेटीनावरील रक्त वाहिनीमध्ये गुठळ्या होवून रोगट रक्त वाहिन्यांचे जाळे तयार होते. व डोळ्यात वारंवार रक्तस्राव होतो रेटीनाला सूज येवून  नजर कायमची जावू शकते. डोळ्याचा रेटीना सटकतो त्यालाच रेटीनल डिटॅचमेंट असे म्हणतात त्यामध्ये डोळ्यासमोर काळे ढग आल्यासारखे वाटतात व अचानक नजर कमी होते. डोळ्यांच्या स्नायुंना पॅरालेसीस झाल्यामुळे तिरळेपणा देखील येऊ शकतो.

     रक्तदाब वाढल्यामुळे आपल्या शरीरातील व डोळ्यातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रेटीनाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या लहान गाठी तयार होवून रक्तवाहिनी बंद पडते व त्या भागाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे तो भाग निकामी होते याप्रकारे दृष्टीबिंदूवर देखील डाग पडून नजर कायमची अधू होवू शकते. ऑप्टिक नर्व्हला सूज येऊ शकते.

     यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून मधुमेही व रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी आपल्या आजाराची पथ्थे पाळावीत व डोळ्यांना काही त्रास नसला तरीही नेत्रतज्ञांकडून दरवर्षी आपल्या डोळ्याची तपासणी करून घ्यावी गरज वाटल्यास OCT मशीनद्वारे तपासणी व डोळ्याची Angiography करून घ्यावी व त्यानुसार जास्त त्रास वाढल्यास रेटीना तज्ञा कडून लेझर थेरपी व intravetrial इंजेक्शन व इतर उपचार करून घ्यावेत.

     थायरॉईड ग्रंथीच्या विकारामध्ये डोळ्याच्या भोवतालची स्नायू प्रभावित होतात, त्याची हालचाल नीटशी होत नाही. डोळ्याच्या मागील पोकळीमध्ये चरबी साठून डोळे पुढे आल्यासारखे दिसतात. पापण्या जास्त लवत नाहीत व त्यामुळे डोळ्याची बुबुळे कोरडी होवून त्यात जखमा होण्याची शक्यता असते.

     डोळ्याची नस मेंदूला जोडलेली असल्यामुळे मेंदूमधील घटनेचे पडसाद डोळ्यात उमटणे हे अगदी स्वाभाविक आहे. बऱ्याच वेळा मेंदू मधील गाठ (ब्रेन ट्युमर ) चे निदान शंका घेतल्याने डोळ्याचे डॉक्टर लवकर करू शकतात. ब्लड कॅन्सर व शरीरातील इतर ठिकाणच्या कॅन्सरचे निदान हि डोळ्याच्या सखोल तपासणीतून करता येवू शकते.

     संधिवातामुळे डोळ्याच्या पांढऱ्या बुबुळावर व बाहुलीला सूज येते. टी. बी. ,कुष्टरोग, एडस यासारख्या संसर्गजन्य आजारामध्येही बाहुली व रेटीनाला सूज येवून नजर कमी पडू शकते. मायग्रेन मध्ये जास्त लाईट सहन होत नाही व डोकेदुखी बरोबरच डोळे हि दुखतात. अॅलर्जीक सर्दी मध्ये नाकाबारोबरच डोळ्यांचीही तक्रार असतेच तापामध्ये डोळ्यांची आग होवून डोळे लाल होतात व पाणी येते.लिव्हर सिरोसीस व काविळीचे कारण शोधताना डोळ्याची तपासणी महत्वाची ठरते.

     एकंदरीत डोळ्याच्या काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणामधून आपल्याला इतर अनेक रोगाचे निदान,औषधोपचार व आजाराची प्रगती मॉनिटर करता येते हे निश्चित. त्यासाठी संबधीत डॉक्टरांशी विचार विनिमय व परस्पर सहकार्य महत्वाचे ठरते.